१) स्वगती शाळेविषयी......
गतिमंद विद्यार्थ्यांचा आधार : रोटरी रेडक्रॉस स्वगती शिक्षण शाळा समाजातील गतिमंद असणाऱ्या, इतर मुलांच्या तुलनेत आकलन, बुद्ध्यांक आणि एकूणच गती काहीशी कमी असणाऱ्या विशेष मुलांसाठी काम करते. गतीमंद विद्यार्थ्यांना आयुष्यात स्वावलंबी बनविणे आणि शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देत त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करणे हा रोटरी रेडक्रॉस स्वगती शिक्षण शाळा चालविण्यामागचा हेतू आहे.
समाजातील प्रत्येक गतीमंद मूल त्याच्या संथ गतीने का होईना परंतु इतर मुलांप्रमाणे समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे हेच अंतिम उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून रोटरी स्वगती शिक्षण शाळा १ जून १९९१ पासून गेली ३१ वर्षे अखंडपणे कार्यरत आहे.
या शाळेत विद्यार्थ्यांच्या कलाने देण्यात येणाऱ्या शिक्षणाच्या आणि उपक्रमाच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा आधार आहे.
२) स्वगती शाळेचा इतिहास
स्वगती शिक्षण शाळेची सुरुवात सोलापूरातील ख्यातनाम नेत्ररोग तज्ञ कै. डॉ. मधुसूदन अलबाळ, त्यांच्या पत्नी कै. प्रमोदिनी अलबाळ आणि कै. प्रा. भालचंद्र जेऊरकर व त्यांच्या पत्नी कै. साधना जेऊरकर यांनी १ जून १९९१ रोजी केली.
अलबाळ दांपत्याने दत्तक घेतलेली मुलगी स्मिता गतिमंद होती. हे कळताच अलबाळ दांपत्य प्रारंभी काहीसे निराश झाले खरे, परंतु तब्बल ८० हजार नेत्र शस्त्रक्रिया गोरगरिबांसाठी सामाजिक बांधिलकी म्हणून चक्क मोफत करणारे डॉ. मधुसूदन अलबाळ यांच्यातील निस्सीम समाजसेवक जागा होता. आपल्यावर आलेल्या संकटाला तोंड देतच समाजातील इतर पालकांवर आलेल्या संकटाचे निवारण कसे करता येईल ? असा विचार अलबाळ दांपत्याने केला. याच विचारातून एक दिवस गतिमंद विद्यार्थ्यांसाठीच्या शाळेची कल्पना सुचली अन् स्वगती शिक्षण शाळेचा जन्म झाला. रोटरी क्लब ऑफ सोलापूरचे तत्कालीन अध्यक्ष प्रा. भालचंद्र जेऊरकर यांचा भक्कम पाठिंबा होता आणि त्यांच्या या शाळेसाठी तन-मन-धन देण्याची तयारी यांमुळे शाळा स्थापने मागचा हेतू सफल होत गेला. त्यांच्याच प्रेरणेतून ३१ वर्षांच्या कार्याचा आज वटवृक्ष झाला आहे.